मुंबई/प्रतिनिधी – भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाची घोषणा केली आहे. 27 मे 2024 पासून सुरू होणारा हा महोत्सव म्हणजे सिनेमा आणि संस्कृतीचा सहा दिवसांचा उत्सव आहे. हा अनोखा महोत्सव, मुंबईत पेडर रोड येथील भारतीय चित्रपटाच्या राष्ट्रीय संग्रहालयात आयोजित केला जाईल. एनएफडीसी आणि अर्जेंटिनाचा समृद्ध सिनेमॅटिक वारसा प्रतिबिंबित करणाऱ्या पुनर्संचयित अभिजात चित्रपटांचे प्रदर्शन या महोत्सवात केले जाईल.
मनमोहक अशा टँगो नृत्य सादरीकरणाने महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर, समीक्षकांनी गौरवलेला “अन लुगर एनेल मुंडो” हा अर्जेंटीनाचा चित्रपट दुपारी चार वाजता प्रदर्शित केला जाईल. महोत्सवाच्या उद्घाटनाला अर्जेंटिनाचे महावाणिज्य दूत डॅनियल क्वेर कॉन्फलोनीरी आणि हीरामंडीमधील प्रतिभावान अभिनेते ताहा शाह बदुशा उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण महोत्सवात, प्रेक्षकांना निवडक चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. अर्जेंटिनाच्या सिनेमाचे वैविध्यपूर्ण कथन आणि सांस्कृतिक चित्रण असणारे मेड इन अर्जेंटिना आणि कासा डी फ्यूगो हे चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील. भारतीय चित्रपटसृष्टीतील एनएफडीसीच्या योगदानाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महोत्सवात ‘एक दिन अचानक’ आणि ‘रुदाली’ हे चित्रपटही दाखवले जातील तसेच जागतिक दूध दिनाच्या सन्मानार्थ 1 जून 2024 रोजी ‘मंथन’ चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. हा एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सव, भारत आणि अर्जेंटिनाच्या सांस्कृतिक आणि सिनेमॅटिक परिदृश्यात एका नवीन दालनाची सुरुवात करून सिनेप्रेमींसाठी एक समृद्ध अनुभव प्रदान करणारा आहे. चित्रपटांच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या कलात्मक प्रयत्नांची प्रशंसा करणे आणि या प्रयत्नांबद्दल रसिकांना सजग करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
चित्रपट प्रदर्शनाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे –
उद्घाटन समारंभ आणि चित्रपट प्रदर्शन : 27 मे 2024, दुपारी 3:30 वाजता
दररोजचे चित्रपट : 28 मे – 1 जून 2024, संध्याकाळी 4:00 वाजता
स्थळ : भारतीय चित्रपटाचे राष्ट्रीय संग्रहालय, पेडर रोड, मुंबई.