नेशन न्यूज मराठी टिम.
ठाणे/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील नागरी भागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या साहित्यिक लेखनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने (महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकारी संघटना) नागरी साहित्य लेखन स्पर्धा-२०२३ घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी घेऊ इच्छिणाऱ्यांनी २० सप्टेंबर २०२३ पूर्वी आपले लेख,कथा, कविता पाठवावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासन संचालक तथा आयुक्त मनोज रानडे यांनी केले आहे.
नागरीकरण वेगाने होत असताना ग्रामीण भागातून शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. अशा सुमारे ५५% लोकसंख्या असलेल्या नागरी भागातील साहित्यिक वारसा देखील तेवढाच समृध्द व्हावा, नागरी भागातील कला, संस्कृती, साहित्य यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने व अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यातील साहित्यिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेमार्फत नागरी साहित्य लेखन स्पर्धा-२०२३ आयोजित करण्यात आलेले आहे.
वरील स्पर्धा गटातील सहभागी साहित्यिकांनी आपले साहित्य लेखन श्रीम. फाटक (भ्रमणध्वनी क्रमांक- ९८२३७१३६९२ या व्हॉटस्अॅपवर किंवा dmabestpractices@gmail.com या ई-मेलवर (युनिकोड फॉन्टमध्ये) दिलेल्या मुदतीपर्यंत पाठवाव्यात. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उल्हासनगर महापालिका (संपर्क क्रमांक ९४०४२४२८२३), श्रीम. प्राची साळवी, संगणक अभियंता, न.प.प्र.सं. (संपर्क क्रमांक ९५७९१९५०५९) यांच्याशी संपर्क करावे.
याचबरोबर आगामी अंमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नगरपालिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
संमेलनाच्या आदल्या दिवशी ग्रंथ दिंडीमध्ये महाराष्ट्रातील नगरपालिका / नगरपंचायती आणि महानगरपालिका सहभागी होतील. साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी अशा नगरपालिकांसाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात येईल. ज्या नगरपालिकांच्या वाचनालयांचा / ग्रंथालयांचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव झाला असेल अशा या नगरपालिका साहित्य संमेलनाच्या दिवशी जे प्रदर्शन असेल तिथे आपली माहिती प्रदर्शित करतील.
नगरपालिकांच्या ज्या वाचनालयांचा / ग्रंथालयांचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव झालेला आहे त्यांचे पुस्तक संपादित करुन प्रकाशित करण्यात येणार आहे. सर्व नगरपालिका / नगरपंचायती आणि महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी नागरी साहित्य लेखन स्पर्धा- २०२३ व अंमळनेर येथील होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभाग घ्यावा, असेही आवाहन रानडे यांनी केले आहे.