नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/ प्रतिनिधी –मुसळधार पाऊस पडत असूनही आपले मानवसेवेचे ब्रिद जपत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी संत निरंकारी सत्संग भवन, बदलापुर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 133 आणि राजावाडी मुंबई पब्लिक स्कूल, विद्याविहार येथे आयोजित रक्तदान शिबिरात 73 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची शिकवण धारण करत निरंकारी भक्त रक्तदाना व्यतिरिक्त नेत्रचिकित्सा शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण इत्यादी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेच्या कार्यात आपले योगदान देत असतात.
बदलापुरच्या रक्तदान शिबिरामध्ये जे.जे.महानगर रक्तपेढीमार्फत रक्त संकलन करण्यात आले. या शिबिराला अनेक मान्यवर व्यक्तींनी सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये माजी नगर सेवक शरद तेली व तुकाराम म्हात्रे यांचा समावेश होता. यावेळी मंडळाच्या स्थानिक प्रबंधकांशिवाय जे.जे. महानगर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अजय भिसे तसेच कैलास कुटे, जगदीश म्हात्रे आदि उपस्थित होते.
संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी माधवराव पोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल युनिट आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.