नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – मुलींसाठी नुकतीच सरकारने लेक लाडकी योजना जाहीर केली आहे. त्याच बरोबर सरकार नेहमीच मुलींसाठी अनेक योजना जाहीर करत असते, त्यात मुलींच्या शिक्षणाचा स्तर सुधारावा यासाठी सरकारने घोषणा केली खरी, मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र फुलंब्री तालुक्यातील निधोना, आडगाव, पिंपळगाव, मसला, गावांमधे पाहायला मिळत आहे. शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थिनीचा या जीवघेण्या प्रवासावर सरकार कधी लक्ष देणार.असा प्रश्न विद्यार्थिनी विचारात आहेत.
दोनशे मुलींना एकाच बस मधे किंवा जीपच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो. तर घरी जाताना आठ ते नऊ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याने ग्रामीण भागात शिक्षण किती जिकरीचे झाले याचा प्रत्यय येतो. जीवघेण्या प्रवास बाबत सांगताना विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. एकीकडे सकारात्मक सरकारी घोषणा तर दुसरीकडे विदारक चित्र असल्याने शिक्षणाचा स्तर खरंच सुधारतोय का? हा प्रश्न निर्माण होतो. त्याच बरोबर जीपच्या टपावर बसून प्रवास करताना मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? या परिस्थितीवरून लक्षात येते कि सरकार फक्त राजकारणात आणि करोडोच्या घोषणा करण्यात व्यस्त आहे,
विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. ग्रामीण भागात आजही शिक्षणाची म्हणावी तशी व्यवस्था नाही. जिल्हा परिषद शाळांची उपलब्धता असली तरी तिथे फक्त सातवी वर्गापर्यंत शिक्षण उपलब्ध होते. पुढील शिक्षणासाठी मात्र जिथे सुविधा असेल त्या गावी जावं लागत. अशीच परिस्थिती ग्रामीण भागातील बहुतांश तालुक्यांमध्ये पाहायला मिळेल, यात काही नाविन्य नाही. मात्र शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते ही अवस्था काही ठिकाणी पहावी लागते. फुलंब्री तालुक्यातील निधोना, आडगाव, पिंपळगाव, मसला, रेल, वाहेगाव येथे विद्यार्थिनींना जीवमुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. संभाजीनगर – पिशोर या एकाच बसवर एकाच वेळी दोनशे मुलांना शाळेत घेऊन जावं लागतं आहे. याआधी बाबरा मार्गाची बस सुरू असल्याने अडचण येत नव्हती, मात्र राज्य परिवहन विभागाने अचानक ती बस बंद केल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागतं आहे.
बस मधे विद्यार्थ्यांना जागा राहत नाही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी असलेली बाबरा कडे जाणारी बस अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे शाळेच्या वेळी जाणारी पिशोर कडे जाणाऱ्या बसचा आधार मिळाला. मात्र त्यात अनेक प्रवासी आधीच प्रवास करत असतात, त्यात महिलांना अर्धे तिकीट करण्यात आल्याने बसमधे महिलांची गर्दी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे वेळेवर बस येऊनही त्यात जागा मिळणे विद्यार्थ्यांना अडचणीचे जाते. अवघे पन्नास ते साठ प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असणाऱ्या बस मधे आधीचे प्रवासी आणि दीडशे मुली शाळेत सोडण्याची वेळ येते. त्यामुळे विद्यार्थिनींना अक्षरशः एकमेकांच्या अंगावर बसुन प्रवास करावा लागत आहे.
घरी येण्यास होतो उशीर अनंत अडचणींचा सामना केल्यावर शाळेत आलेल्या मुलींना घरी जाताना मात्र अक्षरशः पायी जावं लागत. शाळा सुटल्यावर वाहन उपलब्ध झाले नाही तर पायी घर गाठावे लागते. दिवसभर शाळेत अभ्यास करून दमलेल्या अवस्थेत आठ ते नऊ किलोमीटरचा प्रवास चालत करावा लागतो. त्यामधे मद्यपी देखील येता जाता टोमणा देत त्रास देतात. त्यामुळे काही वेळा भीती वाटत असल्याची भावना विद्यार्थिनीने व्यक्त केली. तर मुली घरी येई पर्यंत आई वडिलांना चिंता असते ती वेगळीच. त्यामुळे तातडीने बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थिनी आणि पालकांनी व्यक्त केली.