नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिक मधील कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा कांदा हा अनेक दिवसांपासून बेवारस अवस्थेत पडून आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या आडचणींना सामोरे जावे लागत आहे. एक एप्रिल पासून कांदा व्यापाऱ्यांनी हमाली तोलाई न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपायचे नावच घेत नाहीये. यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प आहे. येवला, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांदा,धान्य यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्याने रोज होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प आहे.
या संदर्भात कांदा व्यापाऱ्यांची बैठक होणार असून पुढील रणनीती कांदा व्यापारी ठरवणार आहे. तरी जी हमाली तुलाई द्यावी लागते ती देणार नाही अशा निर्णयावर कांदा व्यापारी ठाम आहेत. कांदा व्यापारी व माथाडी कामगार यांच्या मधील संघर्षामुळे जिल्हा उपनिबंधक यांनी व्यापाऱ्यांना कांदा लिलावात सहभागी व्हा अन्यथा परवाने रद्द करू असे आदेश दिले असून सुद्धा कांदा व्यापारी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत.
आज देखील बाजार समितीत सहभाग न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा व्यापाऱ्यांनी खाजगी मार्केट द्वारे शेतकऱ्याचा कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी आपला कांदा विकून थोडे फार पैसे कमवू शकतो. कारण संघर्ष हा कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये आहे पण गरीब शेतकऱ्यांची यात पिळवणूक होत आहे.