नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या आठवड्यात विशेष पथकांनी वीजचोरी शोध मोहिमेत ३ हजार ७१८ वीज जोडण्यांची तपासणी केली. यात विशेष पथकांनी तब्बल ५०३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देत एक कोटी २९ लाख रुपयांची ९ लाख १० हजार युनिट विजेची चोरी उघडकीस आणली. तर पथकांच्या तपासणीत १७० ठिकाणी २६ लाख रुपयांच्या (७५ हजार ७३२ युनिट) विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी, पोलिस, सुरक्षारक्षक, जनमित्र, कर्मचारी यांचा समावेश असलेल्या विशेष पथकांकडून ही धडक मोहीम राबवण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या एकूण वीज जोडण्यांपैकी १३.४७ टक्के जोडण्यांमध्ये मीटरशी छेडछाड अथवा थेट मीटर बायपास करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित ५०१ ग्राहकांवर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई सुरू आहे. तर अनधिकृत वीजवापर आढळलेल्या १७० जणांवर कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील पारनाका, वाडेघर, उंबर्डे, नेतीवली, हाजीमलंग, नांदिवली, शीळ, सोनारपाडा भागात १८२ ठिकाणी ४३ लाख २४ हजार रुपयांची (२ लाख ४३ हजार युनिट) वीजचोरी आढळून आली. उल्हासनगर व कल्याण ग्रामीण विभागातील अंबरनाथ पश्चिम, लालचक्की, तानाजी नगर, इंदिरा नगर, बुवापाडा, खुंटवली, व्हिनस चौक, सेक्शन-२५, कुला कँप, गोवेली, कोन, मांजर्ली, फर्डेपाडा, धसई, शहापूरच्या ग्रामीण परिसरात ८५ जणांकडे २४ लाख ९४ हजार रुपयांची (१ लाख ७१ हजार युनिट) वीजचोरी सापडली.
वसई विभागात वलिव, कोल्ही, गोखिवरे, नायगाव, उमेलमन तर विरार विभागात बाजार वार्ड, फुलपाडा, मानवेलपाडा, चंदनसार, बरफपाडा भागात ४१ लाख २० हजार रुपयांची (२ लाख ५९ हजार युनिट) वीजचोरी उघड झाली. तर पालघर विभागात बोईसर शहराचा काही भाग, नांदगाव, चिंचणी, वानगाव, सरावली, देलवाडी, दांडी परिसरात १९ लाख ५२ हजार रुपयांच्या (२ लाख ३० हजार युनिट) वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात विशेष पथकाना यश आले.
वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाई सुरू आहे. कल्याण परिमंडलात वीज चोरी शोध व कारवाईच्या मोहिमा नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे.