नेशन न्यूज मराठी टीम.
यवतमाळ / प्रतिनिधी – रोजगाराचे प्रश्न गेले कित्येक वर्षात गंभीर होत चालले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून खाजगीकरण करून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्याचा जी आर नुकताच जाहीर आला आहे. केंद्र व राज्य सरकारने मागील काही वर्षांत घेतलेल्या निणर्यांचा संघटित, असंघटित क्षेत्रातील सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रातील कर्मचारी, बेरोजगार, शेतकर्यांसह सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर विपरित परिणाम झाला आहे. समाजातील सर्वच क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी यवतमाळातील आझाद मैदानातून संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात दीडशे संघटनांची वज्रमूठ दिसून आली आहे.
सरकारी, निमसरकारी, खासगी क्षेत्रातील संघटित, असंघटित कर्मचारी, बेरोजगार, पेंन्शनर्स व शेतकरी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पहिल्या टप्प्यातील आंदोलनात सर्वच क्षेत्रातील हजारो लोक सहभागी झाले होते. शासनाने दखल न घेतल्यास ऑक्टोबर महिन्यात तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सरसकट जुनी पेन्शन योजना, कंत्राटीकरण रद्द करून कंत्राटी कर्मचार्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, शिक्षकांची 55 हजार रिक्तपदे भरण्यात यावी, शेतकर्यांना विनाअट 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, स्वामीनाथन आयोगासह अन्य मागण्यांसाठी हा संघर्ष मोर्चा काढण्यात आला.