नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या खामगाव फोटोग्राफर्स वेल्फेअर असोसिएशनने आज जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा केला. या दिनी शहरातील छायाचित्रकारांनी खेकाळे फोटो स्टुडिओ अग्रेसन चौकातून श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून डोक्याला लाल फेटे बांधून आकर्षक पालखीत कॅमेऱ्याला विराजमान करून दिंडी काढण्यात आली. दिंडीचे उद्घाटन खामगावचे शामराव तांबटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या दिंडीत ज्येष्ठ छायाचित्रकार प्रल्हाद वाघ, सुभाष जैन, सुभाष बोचरे, नितीन वडवाले यांच्यासह खामगाव शहर व तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधवांनी आपल्या परिवारासह आकर्षक पोशाखात या कॅमेरा दिंडीमध्ये सहभाग घेतला. या दिंडीत 100 वर्ष जुना असलेला फोटोग्राफीसाठी वापरला जाणारा प्लेट कॅमेरा, एक व्हिडिओ कॅमेरा, एक फिल्म कॅमेरा शहरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. ही अभिनव दिंडी अग्रेसन चौकापासून प्रारंभ होऊन जगदंबा चौक, फरशी, एचडीएफसी बँक, नॅशनल शाळेच्या मार्गे मुक्तेश्वर आश्रम परिसरात येऊन या ठिकाणी दिंडीचा समारोप करण्यात आला.
या दिंडीमध्ये फोटोग्राफर्स बांधवांनी भक्ती भावाच्या वातावरणात टाळ व मृदुंग वाजवत संपूर्ण शहरातून दिंडी काढली. दरम्यान, या कॅमेरा दिंडीचे ठिक-ठिकाणी जल्लोषात अनेकांनी दिंडीचे स्वागत करत, छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. यानंतर मुक्तेश्वर आश्रम येथे खामगाव फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सुद्धा आयोजित करण्यात आला होता.