नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – श्रीराम रथोत्सवानिमित्ताने कुस्त्यांचे भव्य सामने येत्या ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरुवात होणार असून यावर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती लक्षवेधी ठरणार आहे. अशी माहिती केशव स्मृती प्रतिष्ठान व श्रीराम मंदिर संस्थानतर्फे गुरूवारी येथे केशवस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील व कुस्त्यांची दंगल उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख दीपक जोशी यांनी दिली. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे रथोत्सव आटोपल्यानंतर कुस्त्यांच्या दंगलीची परंपरा संत जाप्पा महाराज यांच्या काळापासून होती. मात्र नंतर अनेक वर्षे ही परंपरा खंडीत झाली. ही परंपरा केशवस्मृती प्रतिष्ठानने राखत गेल्या सात वर्षांपासून कुस्त्यांची दंगल पुन्हा सुरू झाली आहे. जिल्हाच नव्हे तर राज्यातील विविध भागातून मल्ल यात सहभागी होत असतात. शुक्रवारी श्रीराम मंदिर संस्थानचा रथोत्सव आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी ही कुस्त्यांची दंगल शहरातील शिवतीर्थ मैदानावर या दिवशी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात होईल. या कुस्ती महोत्सवाचे यंदाचे
वैशिष्ठ म्हणजे प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती शहरात रंगणार आहे. ‘भारत विरूद्ध जॉर्जिया’ अशी ही कुस्ती असेल. पुणे येथील पै. भारत मदने व जॉर्जिया देशातील पै. टॅडो जॉर्जिया यांच्यातील ही कुस्ती लक्षवेधी ठरणार आहे. या कुस्ती महोत्सवात राज्यातील पुणे, संभाजीनगर, खंडवा, धुळे, कोल्हापूर, भोपाळ, बारामती यासह जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, भुसावळ, एरंडोल, जामनेर, पारोळा यासह विविध भागातून मल्ल येणार आहेत.
मुलींचे कुस्ती लक्ष वेधणार
या महोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे मुलींची कुस्ती लक्ष्यवेधी ठरणार आहे. गेल्या तीन वर्षापासून या महोत्सवात मुलींचाही सहभागी असतो. यात प्रामुख्याने खंडवा (म.प्र.). एरंडोल, अकोला, चाळीसगाव, धरणगाव येथील मुलींचा सहभाग असेल.
कुस्त्यांची दंगल यशस्वी व्हावी यासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यात समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, आखाडा जोड प्रमुख सुनील शिंदे, कार्याध्यक्ष राहूल वाघ, उपाध्यक्ष दिलीप कोळी, सचिव दीपक गवळी, माधवराव कुलकर्णी, डॉ. शांताराम सोनवणे, विजय वाडकर, चत्रभूज सोनवणे, दत्तू भामरे, यासह पदाधिकारी कुस्त्यांची दंगल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.