नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी -भारतीय चित्रपट सृष्टीत तेलुगू चित्रपटांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनावर आपल्या अभिनयाची विशेष छाप सोडणाऱ्या एन.टी. रामाराव यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवंगत एन.टी. रामाराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्मृती प्रीत्यर्थ विशेष नाणे प्रकाशित केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, दिवंगत एन टी रामाराव यांनी तेलुगू चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपट आणि संस्कृती समृद्ध केली. त्यांनी आपल्या अभिनयाने रामायण आणि महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा जिवंत केल्या. त्यांनी साकारलेल्या भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्या व्यक्तिरेखा इतक्या जिवंत होत्या, की लोक एनटीआर यांची पूजा करू लागले. एनटीआर यांनी आपल्या अभिनयातून सर्वसामान्यांच्या वेदनाही व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या ‘मानुशुलान्ता ओक्कते’, म्हणजेच सर्व माणसे समान आहेत, या आपल्या एका चित्रपटातून त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेचा संदेश दिला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, एक लोकसेवक आणि नेता म्हणून एनटीआर यांची लोकप्रियता तेवढीच व्यापक होती. त्यांनी आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाने आणि कठोर परिश्रमांनी भारतीय राजकारणात एक आगळा वेगळा अध्याय निर्माण केला. त्यांनी अनेक लोककल्याणकारी उपक्रम सुरु केले, ज्याचे आजही स्मरण केले जाते.
एनटीआर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विशेष नाणे जारी केल्याबद्दल त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाची प्रशंसा केली. त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची छबी लोकांच्या, विशेषतः तेलुगु भाषिक लोकांच्या हृदयात कायम राहील, असे त्या म्हणाल्या.