नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण जवळील मोहने येथे बंद पडलेल्या एनआरसी कंपनीतील कामगारांसाठी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन आक्रमक झाली असून एनआरसी कंपनीने ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील आंबिवली हद्दीत बांधलेले अनाधिकृत गोडाऊन निष्कासित करणे आणि एनआरसीच्या कामगार वसाहतीला धोकादायक इमारत म्हणून लावलेल्या सर्व इमारतींच्या नोटीसा रद्द करणे आदी मागण्यांसाठी एनआरसी कामगारांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर भरपावसात धडक दिली.
यावेळी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष भूषण सामंत आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात भूषण सामंत यांच्यासह एनआरसी कामगार समन्वय समिति अध्यक्ष सुभाष पाटील, भिमराव डोळस, रामदास वळसे पाटील, जे. सी. कटारिया, वासुदेव पाटील, अर्जुन पाटील, एस. बी. शुक्ला, अरुण भोईर, संजय वाघमारे, सुशील पायाळ, मुक्ता पाटील, सुनंदा शेवाळे, शोभा डोळस आदि पदाधिकारी उपस्थित होते.
मोहोने येथील एनआरसी हि कंपनी सुमारे १४-१५ वर्षापासून कंपनीच्या अडमुठे धोरणामुळे एकतर्फी बंद केलेली असून सुमारे पाच हजार कामगारांच्या कुटूंबियांना उपासमारीच्या खाईत लोटलेले आहे. या कंपनीतील कामगारांची देणी देण्याबाबत व टाळेबंदी बाबत वेगवेगळ्या कोर्टात निर्णय प्रलंबित असून कंपनीने मात्र सन २०२१-२२ मध्ये कारखान्याचे सर्व स्ट्रक्चर पुर्णपणे जमीनदोस्त केले व कंपनीच्या नायलॉन प्लॉन्टच्या पुढील जागेत राज्य सरकारची व केडीएमसीच्या कराची थकीत देणी न देता महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची अथवा कामगार विभागाची कोणतीही परवानगी न घेता हजारो चौ. फुटाचे मोठे गोडाऊन बांधलेले आहे. ते बेकायदेशीर असल्याने त्वरीत निकषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच कामगार वसाहतीमधील इमारतींचे कोणत्याही प्रकारे स्ट्रक्चरल ऑडीट न करता, बोगस प्राथमिक पाहणी अहवाल तयार करून कामगार वसाहती मधील इमारतींना धोकादायक घोषीत करून कामगार कुटूंबियांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण केलेले आहे. या नोटीसा त्वरीत रद्द कराव्यात. कंपनीची एकुण ४५० एकर जागेपैकी अदाणी ग्रुपला फक्त १०५ एकरच जागेचा ताबा लवादाने दिलेला असुन उर्वरीत ३२५ एकर जागे बाबत अदाणी ग्रुपचा कायदेशीर काहीही संबंध नाही. तरी याबाबत त्वरीत योग्य निर्णय घेवून कामगारांना न्याय देण्याची मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली