नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मागील 20 वर्षांपासून मुंबई शहरात गोळीबार करून खून, खुनाचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिद्धार्थ शेट्टी उर्फ सिद्धू उर्फ सिद उर्फ जॉनी याच्या विरुद्ध मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद आहेत. आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी यांने स्वतःची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या आर्थिक फायद्यासह समाजात दहशत निर्माण करणे तसेच गुन्हेगारी जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मागील २० वर्षात आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच प्रतिष्ठित व्यक्तींला खंडणीसाठी धमकावत होता. गुन्हे शाखा, मुंबई मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी यांच्या मार्गावर होती.
आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी हा पूर्वाश्रमीचा गँगस्टर कुमार पिल्ले, गँगस्टर छोटा राजन यांच्या गुन्हेगारी टोळीचा हस्तक म्हणून गुन्हेगारी जगतात सक्रिय होता. गँगस्टर कुमार पिल्ले व नंतर गँगस्टर छोटा राजन यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर प्रसाद विठ्ठल पुजारी यांने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून त्याच्या टोळीतील सदस्यांमार्फत मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील गुन्हेगारी विश्वामध्ये दबदबा निर्माण केला होता. त्याचाच भाग म्हणून त्याच्या हस्तंकामार्फत विक्रोळी येथील राजकीय पक्षाच्या नेत्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून दहशत निर्माण केली होती.
तसेच मुंबईतील सीने जगतामध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठित निर्माता, दिग्दर्शक व कलाकार यांस खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपी प्रसाद पुजारी याच्या गुन्हेगारी टोळीच्या कारवायांमुळे समाजात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. यामुळे त्याचा गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेळोवेळी प्रयत्नांची पराकाष्टा करून प्रसाद विठ्ठल पुजारी यांच्या हस्तकांना पिस्तुलासह मोठ्या सीताफीने अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात तपासामध्ये पुरावा प्राप्त करून त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये स्थापित विशेष न्यायालयासमक्ष खटले दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी काही खटल्यांमध्ये इतर आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा सुनावण्यात आली असून, काही खटले अद्याप न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत. परंतु नमूद गुन्ह्यातील आरोपी असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख प्रसाद विठ्ठल पुजारी हा प्रदेशातून त्याच्या गुन्हेगारी कारवाया करीत असल्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यासाठी गुन्हे शाखा, मुंबई यांच्यासह विविध यंत्रणा आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या मागावर होत्या.
आरोपी प्रसाद हा सन 2004 मध्ये अटक झाल्यानंतर जामीनावर मुक्त झाला व त्यानंतर सन 2005 मध्ये देशाबाहेर पळून गेला. परदेशात गेल्यानंतर देखील त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख चढताच राहिला. सन 2023 पर्यंत तो व त्याच्या साथीदारांच्या विरोधात खूण, खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, कट रचणे, अवैध अग्निशस्त्रे बाळगणे तसेच संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल झाले. मुंबई पोलीस या आरोपींचा विविध देशांमध्ये शोध घेत असताना तो चीन व हॉगकाँग या देशामध्ये वास्तव्यास असल्याचे समजल्याने त्याच्याविरुद्ध सन 2012 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर सन 2023 मध्ये सदर आरोपीच्या विरोधात DEPORTATION / EXTRADITION प्रस्ताव पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून बीजिंग, चीन देशातुन त्याला भारतात आणण्यास गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा, मुंबई यांनी आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी याच्या शोधकामी अगदी गोपनीयपणे राबवलेल्या मोहिमेला यश येऊन दिनांक 23.3.2024 रोजी खंडणी विरोधी कक्ष यांनी आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.