नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे मतदारसंघ महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. ठाणे मतदार संघाकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागून राहिलेले आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर आणि मुंबई महानगर यांचा पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. ठाण्याच्या उमेदवारीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेक दिवसांपासून रस्सीखेच पाहायला मिळाली. तर ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे अशी लढत होणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा मीरा भाईंदर तसेच ठाणे जिल्ह्यात प्रचार सुरू आहे. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सुषमा अंधारे, प्रियंका जोशी, सुहास देसाई ,केदार दिघे, वंदना शिंदे, त्याचबरोबर कृष्णकुमार कोळी ,इ अनेक ठाकरे गटाचे मान्यवर उपस्थिती होते.
राजन विचारे यांनी या सभेत आपण केलेल्या कामांचा आराखडा वाचून दाखवला ते म्हणाले “मी ठाण्यात अनेक विकास कामांना महत्व दिले. माझ्या आयुष्यातले मोठे काम म्हणजे मुलुंड आणि ठाणे दरम्यान चे रेल्वे स्थानक आणण्याचे होते. लवकरच मंजूरी मिळून 1 वर्षात रेल्वे स्थानक होणार. गेल्या 10 वर्षात मी ठाण्यात अनेक कामे करत आलो आहे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हॅट्रिक करून खासदार बनवा” असे आवाहन खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जनतेला केले. तसेच माझ्या या सभेत कुठलीही माणसे भाड्याने आनलेली नाहीत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.