नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी- डोंबिवली पश्चिमेतील स्वामीनारायण सिटी चौक, मोठागाव ते दिनदयाळ चौक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वामीनारायण सिटी चौक ते दिनदयाळ चौक दरम्यानच्या रस्त्यावर वाहने उभी करण्यास (नो पार्किंग) मनाई करण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनेत असे नमूद केले आहे की, मानकोली-मोठागाव उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. सदर रस्ता सुरु झाल्यानंतर भिवंडी-ठाणे ते डोंबिवली असा मार्ग जवळचा असल्याने त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होणार आहे. तसेच डोंबिवली शहरात अरुंद रस्ते असून सद्यःस्थितीत जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरु झाल्यास नमूद मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी शक्यता आहे. संभाव्य वाहतूक कोडी स्वामीनारायण सिटी चौक, मोठागाव ते दिनदयाळ चौक, डोंबिवली पश्चिम या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करणे व्यापक जनहिताच्या दृष्टीकोनातून आवश्यक असल्याचे याबाबतचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले असून असे न केल्यास लहान-मोठे अपघात होऊन जिवीत व वित्तहानी होण्याची स्थिती निर्माण होईल.
तसेच प्रसंगी आपत्तकालीन परिस्थितीत वाहतूक कोंडी सोडविणे व अपघातग्रस्तांना मदत पुरविणे याकरिता मोठ्या समस्या व अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात खालील ठिकाणी नो पार्किंग करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
नो पार्किंगचे ठिकाण :- स्वामी नारायण सिटी चौक ते रेतीबंदर चौक, डोंबिवली पश्चिम दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस 740 मीटर, 24 तास. नो पार्किंगचे ठिकाण :- रेतीबंदर चौक ते सम्राट चौक, दिनदयाळ चौक, डोंबिवली पश्चिम दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस 1500 मीटर, 24 तास. ही वाहतूक अधिसूचना मानकोली- मोठागाव रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या दिनांकापासून अंमलात राहील. ही अधिसुचना फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.
All reactions:11