नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – महिला स्वयंउद्योजिका मंच- या नीती आयोगाच्या, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिला प्रणित विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यस्तरीय प्रकल्पातील, पहिल्या कार्यशाळेचे उद्घाटन, गोव्यात, सीएसआयआर- राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (NIO) च्या सभागृहात, 3 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. गोवा सरकारच्या समन्वयाने आयोजित ह्या कार्यशाळेत, देशाच्या पश्चिम विभागावर लक्ष केंद्रीय करण्यात आले होते.
या कार्यशाळेत 500 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. ज्यात, महिला स्वयंउद्योजिका, स्थानिक बचत गट आणि समूहांच्या प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, इन्क्युबेटर/अॅक्सीलरेटर्स, वित्तीय संस्था, सहाय्यक संस्था आणि इतर अनेक लोकांचा समावेश होता. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा तळागाळापर्यंत विस्तार करण्याच्या उद्देशाने हब-अँड-स्पोक म्हणजे एक केंद्र आणि त्याच्या चहुबाजूंनी विकास अशा मॉडेलवर प्राथमिक लक्ष केंद्रीय करण्यात आले होते.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले की, गोवा सरकार नीती आयोगाच्या मदतीने व्हीजन आराखडा 2047 तयार करणार आहे. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत, डॉ. सावंत म्हणाले की या उपक्रमात कौशल्या विकासावर तसेच, गोव्यातील प्रत्येक तालुक्यात आणि ग्रामपंचायतीत सरकारी सेवा सुविधा पोहोचवण्यासाठी, ‘स्वयंपूर्ण ग्रामीण मित्र’ नियुक्त करण्यावर विशेष भर देण्यात आला होता.
संघराज्य सहकार्य यासाठी नीती आयोग दक्ष असल्याचे सांगत, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी देशाच्या विकासात, राज्यांची भूमिका महत्वाची असल्यावर भर दिला. विकासासाठीचे तीन प्राधान्यक्रम त्यांनी मांडले : रोजगार ते शिक्षण असे गुणोत्तर कायम ठेवणे, महिला स्वयंउद्योजिकांना प्रोत्साहन देणे आणि मनुष्यबळाची पुनर्रचना करणे.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी आधींकरी, बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. प्रत्येक राज्यात नीती आयोगासारख्या संस्था स्थापन करण्यासाठी, नीती आयोग राज्य सरकारांना संपूर्ण मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महिला उद्योजिकांना पाठबळ देण्यासाठी नव्या सहकार्याची यावेळी घोषणा करण्यात आली.
यातील महत्वाच्या तरतुदी म्हणजे, भारतीय महालेखापाल संस्था (ICAI) आणि नीती आयोग यांच्यातील भागीदारी. उदयम अपलिफ्टचा शुभारंभ – महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांमध्ये अनुपालन सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी CAxpert चा एक उपक्रम आणि WEP च्या अवॉर्ड टू रिवॉर्ड
(ATR) उपक्रमांतर्गत पहिल्या दोन गटांचा शुभारंभ. WEP पार्टनर्स मायक्रोसेव्ह कांसलटिंग आणि सीडबी यांच्या नेतृत्वाखाली WEP-उन्नती नावाचा पहिला ATR समूह संपूर्ण भारतातील हरित उद्योजकांकडून अर्ज स्वीकारत आहे. WeNurture नावाच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व अटल इनक्यूबेशन सेंटर – गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करेल.