मुंबई/प्रतिनिधी – मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक जाहीर केल्यापासून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्थानका दरम्यान मध्य रेल्वेने 63 तासांचा 3 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामध्ये जवळपास 960 लोकल ट्रेन (Railway) तसेच एक्सप्रेस रद्द करण्यात आले आहेत. आज रात्रीपासूनच या मेगा ब्लॉकची सुरुवात होणार आहे. त्यामुळेच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वेने प्रवाशांना केले आहे. त्यामुळे नागरिक आपला मनस्ताप व्यक्त करत आहेत. मेगा ब्लॉकच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या (Ncp) वतीने जोरदार निषेध करण्यात आला. विभागीय कार्यालयसमोर निषेध करत हा मेगा ब्लॉक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील मुंबईचे अध्यक्ष ॲड.अमोल मातेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली.