नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी भरतीच्या आदेशा विरोधामध्ये आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना तो आदेश मागे घेण्यासाठी निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची जाळून होळी करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला.
राज्य सरकारने सहा सप्टेंबर रोजी काढलेल्या निर्णयात बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी घेण्याचे आदेश दिले. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये रिक्त असलेले पद कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्ती केले जातील. शिक्षक, इंजिनियर, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर,तांत्रिक अधिकारी, शिपाई, ड्रायव्हर आदी पदे ही कंत्राटी पद्धतीने एजन्सी मार्फत भरले जातील. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नऊ एजन्सीचे पॅनल बनवलेले आहे.त्या पॅनल मधील एका एजन्सीची निवड करून त्याद्वारे भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत.
शिंदे – फडणवीस -अजित पवार सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. या निर्णयामुळे सर्वत्र नाराजी असून फक्त ठराविक एजन्सीचा फायदा करण्यासाठी तसेच काही उद्योजकांना फायदा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप होऊन त्यामध्ये पारदर्शकता राहणार नाही. त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा व मागे घ्यावा अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली.
तसेच सध्या जिल्ह्यामध्ये विविध कार्यालयांमध्ये काही वर्षांपासून कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे. धुळे जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील कर्मचारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, कृषी विभाग, जिल्हा नियोजन, सेतू, वन विभाग, महसूल विभाग, भूसंपादन, महिला बालकल्याण, समाजकल्याण, जल जीवन मिशन, भारत स्वच्छता अभियान, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आदी योजनेमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे. त्यांना वयाच्या 58 वर्षापर्यंत नोकरीची हमी द्यावी. अशी मागणी धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामार्फत यावेळी करण्यात येत आहे.