नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या कल्याण शहरातील वायले नगर येथे 29 मार्च ते 2 एप्रिल 2023 या कालावधीत पाच दिवशीय नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव आयोजित करण्यात आला आहे. प्रदर्शनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे
.या प्रदर्शनाचे उद्घाटन 29 मार्च 2023 रोजी सायं. 4.00 वा. होणार आहे. या ग्रामोत्सवामध्ये विविध माहितीपर कार्यशाळा तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या शेतमालाला व इतर उत्पादनांना थेट ग्राहकांच्या दारात पोहचविण्यासाठी नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे तांदुळ, कडधान्य, मसाले, विविध हस्तकला, मातीच्या वस्तू, गावरान धान्य, पापड, शेवया, लोणचे याबरोबरच वनरोपे, वारली कलाकृती, बांबू आर्टिकल, कृत्रिम फुले, पर्स-पिशव्या, ज्यूटच्या वस्तू आदींची विक्री करण्यात येणार आहे.प्रदर्शनात विविध शासकीय योजनांची माहिती, खरेदीदार-विक्रेता परिसंवादही असणार आहेत. या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांमार्फत उत्पादित मालाच्या प्रचार प्रसिद्धी सोबत बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.