नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई / प्रतिनिधी – सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही समाज प्रबोधनाचे आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतिक आहे. या माध्यमातून स्वच्छता आणि सौंदर्यीकरण यांचा संदेश प्रसारित व्हावा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन मिळावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सुंदर गणेशोत्सव स्पर्धा 2023’ जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेकरिता उद्यान विभागाचे उपायुक्त श्री. दिलीप नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षण समिती स्थापन करण्यात आली असून क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव हे समितीचे सदस्य सचिव आहेत. ही परीक्षण समिती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन स्वच्छता व सुंदरतेच्या अनुषंगाने व्यवस्था ठेवणाऱ्या, त्याविषयी अभिनव पद्धतीने जनजागृती करणाऱ्या व तशा प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची पारितोषिकांसाठी निवड करणार आहे. यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिके देऊन गौरविले जाणार आहे.
‘स्वच्छ सुंदर गणेशोत्सव स्पर्धा 2023’ यामध्ये प्रथमतः विभागीय स्तरावर परीक्षण करण्यात येऊन त्यामधील उत्तम सादरीकरण असलेल्या मंडळांना अंतिम परीक्षण समिती भेट देणार आहे. ही परीक्षण समिती स्वच्छता आणि सुंदरतेच्या अनुषंगाने मंडप व परिसर स्वच्छता, कचरा वर्गीकरण व्यवस्था, प्लास्टिक वापराला प्रतिबंध, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना शाडू मूर्तीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, सजावटीत पर्यावरण पूरक साहित्याचा वापर, स्वच्छताविषयक जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन, ध्वनी मर्यादेचे पालन अशा विविध बाबींचा विचार करून गुणांकन करणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण असणाऱ्या श्रीगणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या माध्यमातून तसेच घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या सहयोगाने ही ‘स्वच्छ सुंदर गणेशोत्सव स्पर्धा 2023’ आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा सन्मान केला जाणार आहे. या अनुषंगाने सर्व गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त यांनी केले आहे.