Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी ठाणे

नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत भव्यदिव्य आणि सुविधाजनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड़कर स्मारक उभारले असून त्यासोबतच हे स्मारक सतत कृतिशील राहील यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे ही अत्यंत प्रशंसनीय गोष्ट असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त जे.एस.सहारिया यांनी भारतीय संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे अधोरेखीत केले.

संविधानाचे महत्व जाणून नवी मुंबई महानगरपालिकेने स्वयंस्फुर्तीने त्यादृष्टीने पुढाकार घेत संविधान विषयक उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांनी आयुक्तांसह सर्व घटकांची प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधान निर्मितीच्या पंच्याहत्तरी निमित्त आयोजित ‘संविधान रोजच्या जगण्यात’ या कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी माजी मुख्य सचिव जे.एस.सहारिया आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी सेवानिवृत्त सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे, अतिरिक्त आयुक्त. संजय काक़डे व सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. श्रीराम पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, स्मारकाच्या नियंत्रक अधिकारी संध्या अंबादे, मुंबई विद्यापिठाचे राज्यशास्त्र प्रा. डॉ. मृदुल निळे, एशियन कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरमच्या विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक अनुया कुंवर, रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंटचे संचालक भीम रासकर, संविधान अभ्यासक व प्रचारक सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी सनदी अधिकारी तथा संविधान दिन या संकल्पनेचे शिल्पकार इ.झेड. खोब्रागडे यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर संविधान दिन ही संकल्पना संपूर्ण राज्यात व देशात राबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिेकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साजेसे स्मारक उभे केले असून संविधानाने आपल्याला दिलेल्या दिशेने प्रामाणिकपणे वाटचाल करावी एवढीच प्रत्येक नागरिकाकडून अपेक्षा असल्याचे सांगितले. संविधान हा आपल्या जगण्याचा भाग असून संविधानाची तत्वे प्रत्येकाला समजतील अशा अतिशय सोप्या पध्दतीने घरोघरी नेण्यासाठी नियोजनबध्द काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 26 नोव्हेंबरपासून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असून त्यापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने त्यादृष्टीने पुढाकार घेत पावले उचलली असल्याबद्दल त्यांनी मु्कतकंठाने कौतुक केले. अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी महानगरपालिकेची कार्यशाळा आयोजनापाठीमागील भूमिका मांडताना प्रत्येक सामान्य नागरिकासमोर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असणा-या संविधानाची माहिती पोहचावी व ती त्याला समजेल अशा भाषेत सांगावी यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिक संविधानाने दिलेल्या आपल्या हक्काबाबत जागरुक असतात मात्र मुलभूत कर्तव्य पालनाची जाणीव ठेवत नाहीत हे लक्षात आणून देत ‘नवी मुंबई ही पहिली संविधान साक्षर महानगरपालिका’ बनविण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबध्द प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे यांनी रोजच्या जगण्यातील संविधान या अभिनव उपक्रमाचे 5 विषयांनुसार सादरीकरण करून मांडणी केली. एशियन कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरमच्या विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम. अनुया कुंवर यांनी या 5 उपक्रमांबाबत गटनिर्मिती करून गटचर्चा घडवून आणली व या विषयानुरूप गटांमधील चर्चेचे निष्कर्ष काढण्याची कार्यवाही केली. संपूर्ण दिवसभरात विविध सत्रांमधून ‘संविधान रोजच्या जगण्यात’ हा उपक्रम राबविण्यासाठी गटनिहाय चर्चा करण्यात आली. यामध्ये 10 ते 12 व्यक्तींचे गट बनवून हर घर संविधान साक्षर, संविधान स्तंभदर्शन, संविधान परिचय प्रमाणपत्र, संविधान प्रचारक, लोकशाही उत्सव या पाच विषयांवर गटांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली. या गटचर्चेमध्ये प्रत्येक गटाने आपल्या विषयानुरूप लोकसहभाग कसा वाढेल याविषयी मांडणी करावी, या विषयास अनुसरून सर्व स्तर तसेच विभिन्न सामाजिक समुहातून नेतृत्व पुढे कसे येईल याविषयी चर्चा घडवून निष्कर्ष काढावेत, संविधान विषयक उपक्रमांसाठी स्मारकाचा प्रभावी वापर करण्याबाबत विचारविनीमयातून मुद्द काढावेत, उपक्रमात जाणवणा-या त्रुटींवरही विचार करावा व त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, उपक्रम सर्वदूर प्रसारित होण्यासाठी संकल्पना मांडाव्यात तसेच धोरण स्वरुपात हा उपक्रम मांडण्यासाठी काय करता येईल याची आखणी करावी अशा विविध बाबींबाबत प्रत्येक गटात आपापल्या विषयांनुसार सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून निघालेले सार प्रत्येक गटाच्या प्रतिनिधीने मंचावर सादरीकरण करून सर्वांसमोर मांडले. या पाचही विषयांवर आधारित सादरीकरणात मांडल्या गेलेल्या मुद्यांचा सर्वंकष विचार करून समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.

यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने ‘संविधान परिचय प्रमाणपत्र कोर्स’ सुरु कऱण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये महाविद्यालयीन तरूणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हा कोर्स उपयोगी ठरेल असेही ते म्हणाले. प्रत्येक महिन्यात स्मारकामध्ये संविधान विषयक चर्चा, परिसंवाद, पुस्तक समिक्षा अशा विविध प्रकारे एक कार्यक्रम आयोजित करण्याविषयी त्यांनी भाष्य केले. त्याचप्रमाणे समुह संघटकांच्या माध्यमातून ‘हर घर संविधान’ हा उपक्रम प्रत्येकाला उद्दिष्ट देऊन यशस्वी करण्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. टप्प्याटप्प्याने या उपक्रमांमध्ये वाढ करून ‘नवी मुंबई संविधान साक्षर’ अभियानाला नवी दिशा देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय संविधान निर्मितीच्या 26 नोव्हेंबरपासून सुरु होणा-या पंच्याहत्तरीपूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने घरोघरी संविधान पोहचविण्याचा निर्धार केला असून या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यासाठी प्रशिक्षित प्रचारक तयार करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले आहे. या कार्यशाळेस उपस्थित राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या या पुरोगामी दृष्टीकोनाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X