नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – शेजारील राज्याकडून वजन काट्यांचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहित स्वरूपात महाराष्ट्र राज्यात विकले जात असल्याने स्थानिक वजन मापे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेत्यांचे नुकसान होत आहे व त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल सुध्दा बुडतो आहे, चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांची सुध्दा कमी दरात खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. या काट्यांना राज्य किंवा केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. हे वजने काटे अप्रमाणित असल्याने ग्राहक हिताची हानी होत असल्याचे निदर्शनास येत आहे, तसेच बाजारात अनधिकृत व्यक्ती त्यांचे स्टिकर वजन काट्यांना लावून त्यांची अनधिकृत विक्री करीत असून, त्यामुळे मान्यताप्राप्त वजने व मापे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेत्यांचे नुकसान होत आहे, अशा तक्रारी / सूचना शासनाकडे मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत.
यानुषंगाने वैधमापनशास्त्र विभागामार्फत वजने व मापे खरेदी/दुरुस्ती / विक्री / उत्पादन करताना शासनाचा अधिकृत परवाना घेऊनच व्यवसाय करावा, परवाना नसलेल्या अनधिकृत व्यक्तींकडून वजने व मापे काटे खरेदी / दुरुस्ती करू नये, प्रत्येक वजन काटयांची नवीन खरेदी करताना अधिकृत परवानाधारकांकडून खरेदी पावतीसह वजने व काट्याची शासनाकडून पडताळणी केल्याबाबतचे मूळ प्रमाणपत्रासह खरेदी करावी, वजने व मापे दुरुस्तीसाठी देताना अधिकृत परवाना दुरुस्तकांस दुरुस्तीकरिता द्यावी व त्यानंतर संबंधित वजन काटा रितसर स्थानिक निरीक्षकांकडून (वैधमापनशास्त्र) पडताळणी व मुद्रांकन करुन घ्यावी, वैधमापनशास्त्र यंत्रणेकडून वजन व माप यांचे उपयोगकर्ते यांच्या आस्थापनेस प्रत्यक्ष भेट देवून सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षक नेमण्यात आले असून, त्यांना या कार्यालयाकडून प्राधिकारपत्र देण्यात आले आहे. तरी सर्व ग्राहक, वजन व माप उपयोगकर्ते, जागरूक नागरीक, व्यापाऱ्यांनी सर्वेक्षण कामास सहकार्य करावे, असे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे.
वैधमापनशास्त्र यंत्रणेव्दारे वैधमापनशास्त्र अधिनियम, २००९ व त्या अंतर्गत नियमातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाते. या कायदयांतर्गत प्रामुख्याने व्यापारी व औदयोगिक आस्थापनाकडे वापरात असलेली वजने मापे यांची नियमित पडताळणी व मुद्रांकन करणे व आवेष्टित (पॅकबंद) वस्तूंवर नियमानुसार उद्घोषणा असणे आवश्यक आहे. आवेष्टित वस्तूवर उत्पादकाचा पूर्ण नाव व पत्ता, वस्तूंचे नाव, वस्तूचे निव्वळ वजन/ माप, पॅकिंग तारीख, कमाल विक्री किंमत (सर्व करांसहित), ग्राहक तक्रार निवारण क्रमांक व ई-मेल पत्ता, ई उद्घोषणा लिहिणे कायदयाने बंधनकारक आहे. तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री, किंमतीत खाडाखोड करणे, वस्तू वजन मापात कमी देणे इत्यादी बाबी कायदयानुसार गुन्हा ठरतात.
या विभागाशी संबंधित कायदा व नियमांचे उल्लंघन होत आहे, असे दिसून आल्यास अथवा तशी शंका असेल तर या विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या ग्राहक तक्रार दूरध्वनी क्र. ०२२-२२६२२०२२ यावर किंवा ई-मेलद्वारे dclmms@yahoo.in या ई-मेलवर तात्काळ संपर्क साधावा. तसेच जिल्हयातील औदयोगिक आस्थापना, व्यापारी, दुकानदार यांच्याकडे वापरात असलेले वजने मापे विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करून द्यावेत, व्यापारी, दुकानदार यांनी नवीन वजने काटे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून पडताळणी प्रमाणपत्रासह विकत घ्यावेत, वस्तू वजन मापात कमी देणे, आवेष्टित वस्तूंची छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे अथवा व्यापाऱ्यांकडील वजने काटे विहित मुदतीत पडताळणी न केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे वैधमापनशास्त्र, ठाणे, जिल्हा क्र. १, उपनियंत्रक राम राठोड यांनी कळविले आहे.
वैधमापनशास्त्र यंत्रणेत ठाणे जिल्हा क्र. १ या जिल्हयात एकूण ९ विभागीय निरीक्षकीय कार्यालये कार्यरत आहेत. या निरीक्षकांमार्फत वैधमापनशास्त्र कायदयातील तरतुदीनुसार अंमलबजावणीचे कामकाज करण्यात येते. वैधमापनशास्त्र अधिनियम २००९ व त्या अंतर्गत नियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीचे काम या यंत्रणेमार्फत केले जाते.