नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – चोरी, वाहनचोरी, दरोडा, फसवणूक आणि पोलिसांवर हल्ला करणे अशा गंभीर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगार कल्याण जवळील आंबिवली येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगाराविरुद्ध ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांत ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगार १० गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता. पोलिसांनी असेही सांगितले की, केवळ महाराष्ट्रच नाही तर तामिळनाडू पोलिसही एका प्रकरणात या गुन्हेगाराच्या शोधात होते.
कल्याणचे एसीपी कल्याण घेटे यांनी सांगितले की, खडकपारा पोलिसांना आरोपी आंबिवली येथे लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड व डीबी पथकाने आंबिवलीच्या मंगलनगरमध्ये सापळा रचून शिताफीने गुन्हेगाराला अटक केली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून एक मोटरसायकल आणि चोरीचे मंगळसूत्रही हस्तगत केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आंबिवलीमध्ये मुंबई पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती या घटनेत देखील आरोपीचा हात होता.