नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – आगामी माजी सैनिक दिनानिमित्त आज( 07 जानेवारी 24 रोजी) मुंबईत मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावरील पदपथावर माजी सैनिक संचलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये, तीनही सेवांमधील शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 हून अधिक माजी सैनिकांनी संचलन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत नरिमन पॉइंट इथे एनसीपीए समोरील किनारी पदपथावर सशस्त्र दलाच्या माजी सैनिकांच्या तिसऱ्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवला.
या कार्यक्रमाला पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख, व्हाईस अॅडमिरल संजय जे सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नौदल फाउंडेशन, मुंबई चॅप्टर (एनएफएमसी) आणि पश्चिम नौदल मुख्य तळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संचलन आयोजित करण्यात आले होते.
युद्धात सहभागी सैनिक, वीर महिला आणि सशस्त्र दलातील माजी सैनिकांना, राज्यपालांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सोबत ठामपणे आहोत हे दर्शवण्यासाठी म्हणून त्यांच्यासोबत काही पावले चालत गेले. संचलनात सहभागी झालेल्या माजी सैनिकांमध्ये, एन एफ एम सी चे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा (निवृत्त), एन एफ एम सी चे माजी अध्यक्ष 90 वर्षे वयाचे कॅप्टन राज मोहिंद्र (निवृत्त), आणि कारगिल युद्धात पाय गमावलेले नाईक दीप चंद यांचा समावेश होता.
संचलन पूर्ण झाल्यानंतर एनसीपीएमध्ये माजी सैनिकांचा गौरव सोहळा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावेळी माजी सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
माजी सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 जानेवारी रोजी ट्राय-सर्व्हिसेस वेटरन्स डे साजरा केला जातो. स्वातंत्र्योत्तर भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ,ओबीई फील्ड मार्शल के एम करिअप्पा,1953 मध्ये गौरवशाली सेवेनंतर या दिवशी निवृत्त झाले. त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस, ट्राय-सर्व्हिसेस वेटरन्स डे म्हणून साजरा केला जातो. या संचलनामध्ये आर्मी बँड, एनसीसी आणि एससीसी कॅडेट्सचाही सहभाग होता आणि देशसेवेसाठी माजी सैनिकांनी दिलेल्या गौरवशाली योगदानाबद्दल नागरिकांमध्ये जाणीव निर्माण करणे, हा या संचलनामागचा उद्देश होता.