कल्याण /संघर्ष गांगुर्डे- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे सोमवारी कल्याण दौऱ्यावर येत असून यावेळी त्यांच्याहस्ते जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कल्याण – डोंबिवली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कल्याण शहरातील ओंकार अपार्टमेंट, पहिला मजला, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ, कल्याण पश्चिम येथे सुरु होत असून, सोमवारी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते आणि जितेंद्र आव्हाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांच्यासह कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.त्याचप्रमाणे कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर नवरंग बैंक्वेट हॉल येथे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक, तसेच डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या चारही विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेण्यात येणार असून यानंतर भव्य मार्गदर्शन मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.