नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सततची मुस्लीम विरोधी भूमिका आणि स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचे गटातटाचे राजकारण याला कंटाळून कल्याण मधील मनसे शहर संघटक यांनी मनसेला राम राम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधत प्रवेश केला आहे. यावेळी रुपेश भोईर यांच्यासह मनसेच्या अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी देखील यावेळी प्रवेश केला आहे. यामुळे कल्याणमध्ये मनसेला मोठी खिंडार पडली आहे. यावेळी शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, जेष्ठ नेते बाळ हरदास, रवी कपोते, विभाग प्रमुख अरुण बागवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेचे शहर संघटक, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष आणि यंगस्टर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष असलेले रुपेश भोईर हे कल्याण पश्चिमेतील मुस्लीम बहुलभाग असलेल्या बैलबाजार परिसरात सामाजिक कार्य करत असून आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदवरील भोंग्यांना विरोध करत मुस्लीम विरोधी भूमिका घेतली. यामुळे मुस्लीम समाजात नाराजी पसरली होती. त्यातच यावर्षीच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मजारवर कारवाई करण्याची मागणी करत मुस्लीम धर्मीयांची आणखी मने दुखावली. राज यांची सततची मुस्लीम विरोधी भूमिका हि बैल बाजार परिसरातील मुस्लीम धर्मियांना न पटणारी आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत याठिकाणी मनसेला मते मिळण्याची शक्यता धूसरच आहे.
त्याचप्रमाणे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक गट तट असून यामुळे पक्ष संघटना वाढीसाठी कोणतेही ठोस पावले उचलली जात नव्हती. अनेक ठिकाणी कार्यकारणी देखील नसून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप यावेळी रुपेश भोईर यांनी केला आहे. आज मातोश्री येथे रुपेश भोईर यांच्यासह मनसे विभाग अध्यक्ष सुधाकर सानप, शाखा अध्यक्ष अमोल सातवे, मनसे वाहतूक सेना कल्याण सरचिटणीस प्रशांत जाधव, मनसे शाखा अध्यक्ष योगेश रोकडे, उपविभाग अध्यक्ष पंकज ठाकूर, शिवसेना चर्मोद्योग सेना कल्याण शहर सचिव आश्विन सातवे, चमोद्योग कामगार सेना अध्यक्ष नरेंद्र भोईर आदी पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.