प्रतिनिधी.
डोंबिवली – कल्याण शीळ रोडच्या खड्ड्यांवरून मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात टोलेबाजी सुरू झाली आहे. राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उपरोधिक आवाहन केल्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनीही राजू पाटील यांना प्रत्युत्तर दिलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येणार असल्यानं तातडीनं ठाण्यातले खड्डे बुजवण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सहज डोंबिवलीचाही फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण शीळ मार्गावरचे खड्डे बुजवले जातील, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं होतं. त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलंय. ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवरच फॉलोअप करणाऱ्या आमदारांनी ट्विटरच्या बाहेर येऊन सहज स्वतःच्या मतदारसंघात एक फेरफटका मारावा, जेणेकरून आपल्या मतदारसंघात कुठेकुठे खड्डे भरणीची कामं सुरू आहेत, ते त्यांना कळेल, असा टोला खासदार शिंदेंनी लगावलाय. शिवाय कल्याण शीळ मार्गावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.