नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – मीठागरांमध्ये मीठ जमा करण्याचे कार्य ज्यांचे पूर्वज करीत होते त्या देशभरातील २२ राज्यांतील लवणकार (आगरी) समाजातील निवडक प्रतिनिधींचे संमेलन नवी दिल्ली येथील राजा राममोहन मेमोरियल हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन जगद्गुरू श्री श्री श्री पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते.
प्राचीन लवणकार आणि व्यापारी जाती संघाच्यावतीने संयोजक कृष्ण कुमार भारती यांनी संमेलनाचे आयोजन केले होते. या बैठकीला समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राला श्री रामृल्लू सागर, कार्यकारी अध्यक्ष एस. पी. सिंग लबाना, कर्नाटक उपारा विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. के. गिरीश उपारा, तेलंगणमधील उपारी शेखर सागर, महाराष्ट्रातून दशरथ पाटील, प्रा. एन. के. हिवरकर, बाळासाहेब गोडसे, अरुण पाटील, दिपक खाटेघरे आदी उपस्थित होते.
देशभरातील लवणकार समाजाच्या प्रगती व न्याय्य-हक्कांसाठी केंद्र व स्थानिक राज्य सरकारांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर देशभरातील लवणकार बांधवांचा रामलीला मैदानावर महामेळावा आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. लवणकार बांधव मलकीत सिंह यांनी कारगिल लढाईत हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्ताने १३ सप्टेंबर रोजी पटियाला जिल्ह्यातील हडाणा गावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लवणकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी सर्व प्रतिनिधीन कडून करण्यात आहे.