नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य वि.वा.शिरवाडकर यांचा जन्म दिवस महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयात मराठी विभाग व आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शहाड येथील मधुसुदन चौक ते महाविद्यालय अशा मार्गाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीत विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

पालखी मध्ये कुसुमाग्रज यांची प्रतिमा, संविधान ग्रंथ, ज्ञानेश्वरी, डॉ. गिरीश लटके लिखित ‘के ४६’ असे ग्रंथ ठेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत फुगड्या घालत त्यांची मिरणुक काढण्यात आली. पालखी सोहळा असे कार्यक्रमाचे स्वरूप आल्याने शहाड गावातील सर्व वारकरी आपल्या टाळ-मृदुंगासह सहभागी झाले. त्यामुळे मिरवणुकीला दिंडीचे स्वरूप येऊन शहाडगाव अभंग ओव्या, टाळ मृदुंगाच्या यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. या ग्रंथ दिंडीत स्थानिक संस्थेचे सचिव तसेच सर्व शाखांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
ग्रंथदिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापकांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वारकऱ्यांचा महाविद्यालयातर्फे शाल देऊन डॉ. गिरीश लटके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व ग्रंथ दिंडी कार्यक्रम समन्वयक डॉ. चिंतामण भोईर यांनी उपस्थितांचे आभार मानले.