नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नांदेड/प्रतिनिधी – राज्यभर लोकसभा निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे. यातच प्रशासनाकडून राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने प्रचार सभा तसेच रॅलीच्या दरम्यान कोणतीही धोकेदायक घटना घडू नये याची दक्षता घेतली जात आहे. मराठा आंदोलनाला जीवंत ठेवणारे मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मराठ्यांचा हीरो अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आता सकल मराठा समाज नांदेड च्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी या संदर्भातले निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्यावर हल्ला केला जाईल या पद्धतीच्या धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून दिल्या जात आहेत. पंकजा मुंडे ,धनंजय मुंडे यांनी मनोज जरंगे यांना बीडमध्ये फिरायचंच आहे असे धमकी वजा वक्तव्य करुण त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडास फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेड तर्फे देण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या समाजकंटकाने जरांगे पाटलांना धमक्या दिल्या आहेत त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी. सबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाज नांदेड च्या वतीने करण्यात आली.