नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
सांगली/प्रतिनिधी – मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यावर आता मनोज जरांगे हे तिसऱ्या टप्प्यातील दौरा करण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यात येणार आहेत. सांगली शहरातील तरुण भारत स्टेडियम वर होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभा यशस्वी होण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी काम करत आहेत. सांगली जिल्ह्यात मायणी मार्गी प्रवेश करत ते विटा येथे पहिली सभा घेतील.
या सभेनंतर नियोजीत वेळेनुसार त्यांचे सकाळी 11 वाजता सांगली शहरात आगमन होईल. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते तरुण भारत स्टेडीयम येथील सभास्थळी दाखल होतील. मराठा आरक्षण लढ्यावर उपस्थित जनसमुदायाला ते मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे आगमन व जनमुदायला पुढील आंदोलन संदर्भात मार्गदर्शन करून कराड कडे रवाना होतील.
सांगली जिल्ह्यातील होणारी ही पहिली सभा असल्याने जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने समुदाय सभेला उपस्थित राहणार आहे.जरांगे पाटलांच्या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येणार असल्याने पोलिसांची कसोटी लागणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील येणाऱ्या गाड्यांसाठी कृष्णा नदीवरील वैरण अड्डा, खानापूर तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी ट्रक टर्मिनस, मिरज पूर्व, जत, कवठेमंकाळ या परिसरातून येणाऱ्या नागरिकांसाठी सांगलीतील आंबेडकर स्टेडियम येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.