नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई / प्रतिनिधी – 17 सप्टेंबर पासून संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमास सुरुवात झाली असून ‘इंडियन स्वच्छता लीग 2 अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कार्यात स्वतःचे वेगळेपण नेहमीच प्रदर्शित केले असून ‘इंडियन स्वच्छता लीग 2’ मध्येही आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर विशेष भर देत विविध उपक्रमांचे व्यापक स्वरूपात आयोजन केले जात आहे.
17 सप्टेंबरला संपूर्ण नवी मुंबई शहरात आठही विभागांमध्ये तब्बल 1 लक्ष 14 हजारांहून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली. या भव्यतम उपक्रमामधून स्वच्छताविषयक जागरूकतेचे आणि एकात्मतेचे विहंगम दर्शन घडले.
याचवेळी खाडी किनाऱ्यावर पाच ठिकाणी राबविण्यात आलेल्या खारफुटी स्वच्छता मोहिमेत 10300 हून अधिक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. त्यामध्ये युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती.
या खाडीकिनारी स्वच्छता मोहिमेत दिल्ली पब्लिक स्कूल जवळील किनाऱ्यावर 1700, तलावा सागरी किनारा करावे येथे 2500, टी एस चाणक्य करावे किनाऱ्याजवळ 1900, शिवमंदिर (डोलावा) किनारा या ठिकाणी 3000 तसेच सारसोळे जेट्टी या ठिकाणी 1200 अशा प्रकारे 10300 हून अधिक महिला व पुरुष नागरिकांनी या किनाऱ्यावरील खारफुटी स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला.
या खारफुटी स्वच्छता मोहिमेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज नेरूळ, सरस्वती कॉलेज सीबीडी बेलापूर, विद्या प्रसारक कॉलेज सीबीडी बेलापूर, डी वाय पाटील कॉलेज बेलापूर, एनआरआय कॉम्प्लेक्स पदाधिकारी, सूर्योदय बँक कर्मचारी बेलापूर, एस व्ही पटेल कॉलेज सीवूड्स, एस एस हायस्कूल सीवूड्स, ज्ञानदीप सेवा मंडळ विद्यालय करावे, एसआयईएस कॉलेज नेरूळ, टी एस चाणक्य (IMU) युनिव्हर्सिटी करावे, स्टर्लिंग कॉलेज फार्मसी नेरूळ, टिळक कॉलेज नेरूळ, एस के कॉलेज नेरूळ, आयसेफ सामाजिक संस्था, डिवाइन फाऊंडेशन, पोलीस अकादमी नेरूळ, सागरी सीमा मंच, मॅन्ग्रुव्हज सोल्जर समूह, इंदिरा गांधी कॉलेज घणसोली, टिळक कॉलेज घणसोली, छबी फाऊंडेशन, जयश्री फाऊंडेशन अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच शाळा - महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनसीसी व एनएसएस विद्यार्थी, शिक्षक तसेच स्वच्छताप्रेमी नागरिक या खारफुटी स्वच्छता मोहिमेत अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.
परिसर स्वच्छतेप्रमाणेच सागरी किनारपट्टी स्वच्छता ही देखील अत्यंत महत्त्वाची असून या खारफुटी स्वच्छता मोहिमेद्वारे सागरी किनारा स्वच्छतेचे महत्व विविध संस्था प्रतिनिधी, युवकांनी व नागरिकांनी अधोरेखित केले.
यावर्षी 'इंडियन स्वच्छता लीग 2' चे घोषवाक्य 'कचऱ्याविरोधातील युवकांची लढाई' अर्थात YouthVsGarbage हे असून या खारफुटी स्वच्छता मोहिमेत विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत ही संकल्पना सार्थ केली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत या खारफुटी स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणांना भेट देऊन सहभागी विद्यार्थी, युवक व नागरिकांचा उत्साह वाढविला. यावेळी सर्वच ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
नवी मुंबईची ओळख सर्वत्र स्वच्छ शहर म्हणून करून दिली जात असताना नागरिकांच्या सहभागाला नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक प्रत्येक स्वच्छता उपक्रमामध्ये अतिशय उत्साहाने आणि हिरीरीने सहभागी होत असतात. 'इंडियन स्वच्छता लीग 2' अंतर्गत कचऱ्याविरोधातील लढाईत युवकांच्या सहभागावर भर देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. 'निश्चय केला, नंबर पहिला' हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून सुप्रसिद्ध गायक संगीतकार तथा स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अँबेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांच्या समर्थ नेतृत्वाखाली 'नवी मुंबई इको नाईट्स' हा संघ संपूर्ण क्षमतेने 'इंडियन स्वच्छता लीग 2' मधील सहभागाकरिता सज्ज झालेला आहे. त्याचेच मूर्तीमंत दर्शन 1.14 लक्ष इतक्या मोठ्या संख्येने युवक व नागरिकांनी एकत्र स्वच्छता शपथ घेत घडविले. खारफुटी स्वच्छता मोहीम हा त्याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता.