नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात गणेशोत्सवाची तयारी मोठ्या आनंदात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. बाजार पेठा गजबजल्या आहेत. मूर्तिकार आपल्या गणेश मूर्तींना शेवटचा हात फिरविण्यात मग्न आहेत. त्याच प्रमाणे प्रशासनही गणेशोत्सवसाठी सज्ज होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंदर्भात महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी, महावितरणचे अधिकारी कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळाना मंडप,स्टेजजवळील कमानीचे शुल्क माफ आणि फायर शुल्कावर 50 टक्के सूट दिली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
त्याच प्रमाणे गणेशोत्सवासाठी लागणा-या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी म्हणजे महापालिकेच्या प्रभागक्षेत्र कार्यालयातून मिळणार असून सर्व प्रभागक्षेत्र कार्यालयात यासाठी एक खिडकी योजना देखील चालू करण्यात असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली. पावसाने उघडीप दिल्यामुळे पुढील 7 ते 8 दिवसात रस्त्यावरील खड्डे महापालिकेतर्फे बुजवण्यात येणार असून नागरिकांसाठी गणेशोत्सवात खड्डे मुक्त रस्ते तयार करण्यात येतील असेही ते पुढे म्हणाले. गांधारी येथील गणेश घाटाची जेट्टी तुटल्यामुळे मेरीटाईम बोर्डामार्फत सदर ठिकाणी रॅम्प बांधण्यात येणार आहे तसेच कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होणा-या मूर्तींचे व्यवस्थित रित्या विसर्जन करण्यासाठी बारावे येथे सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली . त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाच्या वेळी, विसर्जन स्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असेही सुचना त्यांनी अधिकारी वर्गास दिल्या.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निर्मल्य संकलनासाठी कल्याण व डोंबिवली करिता प्रत्येकी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्थळापासूनच हे निर्माल्य संकलीत करण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच उपआयुक्त अतुल पाटील यांनी या बैठकीत दिली त्याचप्रमाणे गणेशोत्सवा करिता शाडूच्या मुर्तीचा वापर करावा तसेच सजावट देखील पर्यावरण पूरक असावी असे आवाहन उपआयुक्त अतुल पाटील यांनी बैठकीत केले.
शासनाच्या “माझी माती माझा देश” या उपक्रमार्तगत जनमानसात देशप्रेम प्रेरीत होण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेतील प्रभाग अधिका-यांचे पथक घराघरातून माती/चिमुटभर तांदुळाचे दाणे संकलित करुन सदर कलश महापालिका मुख्यालयात आणला जाईल या उपक्रमासाठी देखील सर्व नागरिकांनी, गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे अति.आयुक्त मंगेश चितळे यांनी या बैठकीत केले.