डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहता (वय ३८ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या आई मालती मेहता या नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी मालती मेहता आणि त्यांचा मुलगा मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत आतापर्यंत मृतांचा आकडा १३ वर गेला असून एकूण 65 लोक जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहिम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण अद्यापही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या भीषण आगीने अनेकांचा बळी घेतला आहे. अतिधोकादायक कंपन्या आणि रहिवासी जागा यातील अंतर जवळ असल्याने अक्षरशः परिसरात आगीचे हादरे बसले. त्यामुळे स्फोट प्रकरणातील अरोपींवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ही कारवाई ठाणे मानपाडा पोलिस स्टेशनचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उप आयुक्त गुन्हे पराग मणेरे आणि शिवराज पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, सहायक पोलीस शेखर बागडे, पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता पाटील, सुनील तारमाळे, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोहवा ठाकुर, पोहवा भोसले, पोना हिवरे, पोकों तानाजी पाटील यांनी कामगिरी पार पाडली आहे.