प्रतिनिधी.
सोलापूर– सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील मेथवडे गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून मेथवडे गावाने ग्रामपंच्यातीचा कारभार महिलांच्या हाती दिला आहे.ग्रामपंचायतीत संपूर्ण महिला सदस्यांची बॉडी असलेली मेथवडे गाव सोलापूर जिल्ह्यात पहिली ठरले आहे.त्यामुळे जिल्ह्यात ही ग्रामपंचायत चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.गावाने ग्रामपंचायतीची सत्ता महिलांच्या हाती देऊन आदर्श निर्माण केला असून ग्रामपंचायतीवर महिलां राज अवतरल्याने मेथवडे गावातील ग्रामस्थांचे विशेष कौतुक होत आहे.
मेथवडे गाव पंढरपूर -सांगोला रस्त्यावर असून गावची लोकसंख्या सुमारे 3000 च्या आसपास आहे.गावाच्या बाजूने माण नदी वाहते.गावात 9 ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी असून ग्रामपंचायतीच्या स्थापने पासून काही वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध होत होती परंतु 1990 पासून गावात निवडणुका होऊ लागल्या त्यानंतर तब्बल 20 वर्षानी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मेथवडे ग्रामपंचायतीवर राणी रमेश पवार,नलिनी श्रीमंत लेंडवे,सुरेखा नवनाथ पवार,सविता विलास माळी,संगीता परमेश्वर पवार,आशा कल्याण जाधव, पूनम सीताराम शेळके,ज्योती कृष्णा कांबळे,अल्लका आण्णासाहेब माळी या महिला ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून आल्या आहेत.
गावात रस्ते,पाणी,गटारी,वीज यांची समस्या असून येणाऱ्या काळात शासनाच्या माध्यमातून सर्व योजना गावात मार्गी लावणार असल्याचे महिलांनी सांगितले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण बनवू.तसेच त्यांना शासनाच्या माध्यमातून उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ.शासनाच्या सर्व योजना गावात राबवण्याचा प्रयत्न करू असे महिलांनी सांगितले.
ग्रामपंच्यातीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मतदानानंतर होणार असल्याने या नऊ महिला सदस्यांतून कोण सरपंच होणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.सरपंच पदाची निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतीत गावातील दारू बंदीचा ठराव करणार असून गावातील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.गावात सामाजिक सलोखा ठेऊन गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचीत महिला सदस्यांनी निर्धार व्यक्त केला.