महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण परिमंडलात २५१ कोटींचे वीजबिल थकीत,थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन

नेशन न्यूज़ मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी– महावितरणच्या कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे (कृषिपंप तसेच तात्पुरते किंवा कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) २५१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे थकित रकमेची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी फिल्डवर आहेत. वारंवार विनंती करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या कल्याण परिमंडलातील ५ लाख ५८ हजार १८५ ग्राहकांकडे २५१ कोटींचे वीजबिल थकीत आहे. कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत १ लाख ४ हजार ७६९ ग्राहकांकडे ४३ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत १ लाख ६५ हजार १२९ ग्राहकांकडे ८३ कोटी ६२ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख ९५ हजार ३७२ ग्राहकांकडे ७८ कोटी ४१ लाख तर पालघर मंडलातील ९२ हजार ९१५ ग्राहकांकडे ४४ कोटी ९३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. याशिवाय कल्याण परिमंडलातील तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ६७ हजार ४६६ ग्राहकांकडे ४६ कोटी १४ लाख रुपयांची तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २ लाख ८६ हजार ४७७ ग्राहकांकडे २८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×