महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र मुख्य बातम्या

महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला अंतर्गत नाराजी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

धुळे/प्रतिनिधी – लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या महासंग्रामात महाराष्ट्रात जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे. कारण सर्वच मतदार संघामध्ये काही ना काही कुरबुरी पाहायला मिळत आहेत. त्यातच धुळे लोकसभा मतदारसंघातून आता दोन डॉक्टरांची लढाई खासदारकीसाठी रंगणार आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांना आज जाहीर करण्यात आली, त्यामुळे आता या लोकसभा मतदारसंघात माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.शोभा बच्छाव विरुद्ध माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत होणार आहे. डॉक्टर शोभा बच्छाव या गेल्या तीन दशकापासून काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत सुरुवातीला नाशिक महापालिकेच्या महापौर त्यानंतर त्यांनी दोन वेळेस आमदारकी भूषवली आहे यामध्ये आरोग्य राज्य मंत्रीपद सुद्धा मिळालेले असल्याने त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे. मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक शहरातील निवासी उमेदवाराची घोषणा ही डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा रंगली होती.

याच पार्श्वभूमीवर आता बच्छाव यांचं नाव जाहीर होतात काँग्रेस मधीलच पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांना कडाडून विरोध केला जात असल्याचं काही तासातच समोर आलं आहे. काँग्रेस मधून नाराजी नाट्य सुरू झाले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शामकांत सनेर यांनी आपला राजीनामा तयार करून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी श्याम सनेर यांचा कंठ दाटून आला होता. पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राजीनामा दिला असून पुढील दोन दिवसात उमेदवार बदलाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया शाम सनेर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान शाम सनेर यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस मधील नाराजी समोर आली असून याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

त्याचबरोबर डॉ.शोभा बच्छाव यांचं धुळे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून नाव जाहीर होताच धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजेंद्र पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर तिकीट वाटपामध्ये घोळ झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला असून लवकरच काँग्रेसमधील इतरही पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांचं नाव चर्चेत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नाशिकच्या डॉ. शोभा बच्छाव यांना तिकीट देण्यात आलं. यामुळे काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र चालू झालं असून विजेंद्र पाटील यांच्या पाठोपाठ लोकसभा मतदारसंघ समन्वयक कुलदीप निकम यांनी देखील राजीनामा दिला आहे. याच पाठोपाठ सोनू झालसे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर येत्या काही तासांमध्ये असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता मोठ्या प्रमाणावर धुळे जिल्ह्यामध्ये रंगत आहेत.

Translate »
×