नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – रोटरी क्लब ऑफ कल्याण, याज्ञवल्क्य संस्था व महाराष्ट्र बारव मोहिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील आकर्षक बारवांचे छायाचित्र प्रदर्शन कल्याण पश्चिमेतील याज्ञवल्क्य हॉल सहजानंद चौक येथे शनिवार व रविवार रोजी आयोजित करण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरीचे पुढील वर्षीचे जिल्हा प्रांतपाल रोटेरीयन मिलींद कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष मदन शंकलेशा, सचिव पराग कापसे, प्रकल्प प्रमुख अरुण सपकाळे व कल्याण रोटरी क्लबचे इतर सदस्य तसेच याज्ञवल्क्य संस्थेचे विश्वस्त आर. डी. पाठक, अध्यक्ष अ. वा. जोशी व इतर सदस्य उपस्थित होते.
मुंबईतील रोहन काळे या तरुणाने महाराष्ट्रातील १६०० हुन अधिक बारव (स्टेपवेल) दस्तावेजीकरण करुन गुगल मॅप वर प्रसिध्द केल्या आहेत. याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे या बारवांचे संवर्धन मोहीम लोकसहभागातुन साकार होत आहे. ज्याला नागरिकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील “मन की बात” या कार्यक्रमात रोहन काळे यांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण आणि समस्त कल्याणकर मिळुन या वर्षी उन्हाळ्यात राम मंदिर तलाव, पारनाका स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती व महाशिवरात्रीला या तलावात दिपप्रज्वलन साकारण्यात आले होते.
महाराष्ट्र बारव मोहीमेचा पुढचा टप्पा म्हणजे या बारवांचे छायाचित्र प्रदर्शन महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये राबविणे व स्वच्छता तसेच पाणी व्यवस्थापन तसेच आपला अमुल्य वारसा जतन करणे या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे असा आहे. त्याच अनुषंगाने कल्याण येथे हे प्रदर्शन भरविण्या आले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील वास्तुकलेने आकर्षीत अनेक बारवांचे छायाचित्र प्रदर्शीत करण्यात आलेले आहेत. पुढील वर्षी रोटरी जिल्हा ३१४२ च्या वतीने या संदर्भातील अनेक मोठे प्रकल्प प्रस्तावीत करण्यात येतील असे अश्वासन प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी मिलींद कुलकर्णी यांनी दिले.