नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी संकटांना तोंड द्यावे लागते. वातावरणात थोडाही फरक झाला की त्याचा परिणाम पिकांवर होतो आणि नंतर शेतकऱ्यांवर देशोधडीला लागण्याची वेळ येते. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडासह पाऊस येत आहे. या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या या पावसामुळे ज्वारी, तीळ, भुईमूग या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
केळापूर तालुक्यातील अर्ली येथील शेतकऱ्यांनी 500 एकरात ज्वारीची लागवड केली होती. चांगले पीक येईल अशी अपेक्षा असताना अवकाळी पावसाने पिकांची माती केली. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.