प्रतिनिधी.
कल्याण – कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार पद्धत फायदेशीर ठरत आहे. परंतू यातही रुग्णांच्या नातेवाईकांची लूटमार करण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण येथील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनाच याचा अनुभव आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी त्यांच्याकडून कल्याण मधील रुक्मिणीबाई इस्पितळात अर्पण ब्लड बॅंकेने 11 हजार रुपये घेतले आहेत. कोरोना बाधित रुग्णांकडून उपचारासाठी प्राथमिक किंमतीपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर त्याची चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
कल्याण येथील निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप मिसर यांचा पुतण्या ठाणे शहर पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर ठाण्यामधील हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. प्लाझ्मा थेरपीद्वारे त्यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. त्यासाठी कोरोनातून पूर्णपणे बरे झालेला एक डोनरही त्यांना मिळाला. त्यानुसार विचारे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुरस्कृत नंदकिशोर एज्युकेशन सोसायटी अर्पण ब्लड बॅंक येथे प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला घेऊन गेले. त्यावेळी त्यांना किती खर्च येईल हे सांगण्यात आले नाही. दात्याने रक्त दिल्यानंतर ब्लड बॅंकेने त्यांना 11 हजार रुपये चार्ज आकारला. त्यानंतरच ब्लड मधील प्लाझ्मा देण्यात येईल असे सांगण्यात आले. विचारे यांनी त्यांना बाहेर सात ते आठ हजार रुपये पैसे यासाठी घेतले जात असताना तुम्ही एवढे पैसे का घेता अशी विचारणाही करण्यात आली. परंतू त्यांना काहीही ठोस उत्तर देण्यात आले नाही.याविषयी केडीएमसी अधिकारी आणि साथरोग प्रतिबंधक पथक प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या की कोडीव रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी साधारण साडे सात हजार रुपये प्राथमिक खर्च आकारला जातो. या रुग्णांकडून जास्त पैसे घेतले गेले असतील तर ते का घेतले गेले. याविषयी चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले.तर याबाबत आजच महापालिका आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार करणार आहे असे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.