नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
धुळे/प्रतिनिधी – मुंबई-आग्रा महामार्गावर कापूस व्यापाऱ्याला मारहाण करत सात लाख रुपये लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीला धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास धुळे शहरातून आर्वी येथे पैसे घेऊन जाणारा कापूस व्यापारी हितेश शंकर पाटील व त्याच्या मित्राला मागून येणाऱ्या चार दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी अडवत बेदम मारहाण करून त्यांच्याजवळ असलेले सात लाख रुपये हिसकावून पोबारा केला होता. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह शोध पथकाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांच्या टोळीचा शोध सुरू केला.
यासंदर्भात कापूस व्यापारी हितेश पाटील याच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्या दोघांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी, एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुस, तसेच फिर्यादी व आरोपी यांच्याजवळील मोबाईल असा एकूण पाच लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.