नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए च्या विंध्यगिरी या सहाव्या युद्धनौकेच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड या ठिकाणी आज (17 ऑगस्ट, 2023) हा सोहळा पार पडला.विंध्यगिरीचे लोकार्पण हे भारताची सागरी क्षमता वाढवण्याच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीचे निदर्शक आहे. स्वदेशी जहाजबांधणीद्वारे आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनेही हे एक पाऊल आहे. विंध्यगिरी हा प्रोजेक्ट 17 ए चा भाग आहे. तो आत्मनिर्भरता आणि तांत्रिक प्रगतीसाठीची आपली वचनबद्धता दर्शवतो.
हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्वदेशी नवोन्मेषाचे प्रदर्शन घडवतो असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून नजीकच्या भविष्यात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे त्या म्हणाल्या. वाढती अर्थव्यवस्था म्हणजे अधिक प्रमाणात व्यापार. आणि आपला व्यापार- वस्तूंची ने-आण मोठ्या प्रमाणावर समुद्रमार्गे होते. यातूनच आपल्या विकास आणि कल्याणासाठी महासागरांचे महत्त्व अधोरेखित होते असे त्यांनी सांगितले. हिंद महासागर आणि व्यापक हिंद-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षेला अनेक पैलू आहेत. आणि सुरक्षा विषयक धोक्यांचा सामना करण्यासाठी नौदलाने नेहमीच सज्ज राहणे आवश्यक आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.