नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रातील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे शहरातील हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी २ धुळशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सोमवारी दिली. याचबरोबर १३ लार्ज रिफ्युज कॉम्पॅक्टर व स्टेनलेस स्टीलच्या मोबाईल टॉयलेटचे लोकार्पणही महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात आली. या लोकार्पण समयी कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, प्रविण पवार व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
केडीएमसी कडे असलेली कच-याची वाहतुक करणारी वाहने खुप जुनी झाली होती. ही वाहने निर्लेखित करणे गरजेचे होते. त्यानुसार ती वाहने टप्प्याटप्प्याने निर्लेखित करण्यात येत आहेत. स्वच्छ भारत मिशन १.० मधून आपल्याला कचरा व्यवस्थापनासाठी, वाहतुकीसाठी १३ आर.सी. वाहने उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर १५ व्या वित्त आयोगातून धुळशमन करण्यासाठी २ वाहने विकत घेतली आहेत ,तसेच १० सीटचे १ जुने मोबाईल टॉयलेट होते. आता स्वच्छ भारत मिशन १.० अंतर्गत महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्टेनलेस स्टीलची १० मोबाईल टॉयलेटची खरेदी करण्यात आली आहे.
इतर सर्व सीएनजी वाहने घेण्यात आली आहेत, यामुळे प्रदुषणात घट होईल. स्वच्छ भारत मिशन २.० मध्ये आपण कॉम्प्रेस बायोगॅस युनिट कार्यरत करणार आहोत. त्यामधून महापालिकेला उपलब्ध होणारा सिएनजीचा वापर महापालिकेच्या वाहनासाठी करता येवू शकेल. परिणामी महापालिकेच्या खर्चातही बचत होईल, अशी माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.