नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुस-या टप्प्यातील उपक्रमाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे हस्ते आशेळे या ग्रामीण भागात संपन्न झाला. आशेळे हा महापालिकेच्या २७ गावातील ग्रामीण परिसर असून तळागाळातील जनतेला शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ मिळणेकामी आशेळे परिसरात या उपक्रमांतर्गत उभारलेल्या शिबीरामध्ये शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्टॉलची उभारणी करण्यात आली होती.
महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी सुरुवातीला शासनाच्या सुसज्ज व्हॅनवरील माहिती पटाचे अनावरण करीत, “विकसित भारत संकल्प यात्रा” शपथ सर्वांसमवेत घेतली. तद्नंतर शिबीरात असलेल्या स्टॉल्सची पाहणी केली. सर्व शासकीय योजनांच्या स्टॉल्सची पाहणी करीत, स्टॉल धारकांकडून माहिती घेत, त्यांनी लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला.
विकसित भारत संकल्प यात्रेची व्हॅन महापालिकेस उपलब्ध झाली असून पुढील तीन दिवसात महापालिका परिक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावण्यात आलेले आहेत. यात प्रामुख्याने आयुष्मान भारत, आधारकार्ड अपग्रेडेशन इ. योजनांच्या स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनांचा फायदा आपण नागरीकांपर्यंत पोहचवू देऊ शकतो, आरोग्य शिबीराचाही नागरीक लाभ घेत आहेत. या योजनांचा उत्तम प्रतिसाद नागरीकांकडून मिळत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी यावेळी दिली.