महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image बिझनेस महत्वाच्या बातम्या

‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे अशा विविध उद्दीष्टांच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ करण्यात आला.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., अर्था – स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपचे सहसंस्थापक टी. एन. हरी, माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक चेतना गाला, युअर स्टोरी मीडियाच्या संस्थापक श्रद्धा शर्मा, स्टार्टअप एक्स्पर्ट रवी रंजन आदी मान्यवर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ञांद्वारे मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचे उद्दीष्ट हे प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व्यावहारिक माहिती मिळण्यासाठी मदत करणे, स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे हे आहे. या उपक्रमासाठी अंमलबजावणी भागीदार म्हणून “अर्था-स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप” काम करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांसाठी ही संस्था “अर्था स्केल प्रोग्राम” चालवते, ज्याद्वारे स्टार्टअप्सना आर्थिक आणि सामाजिक समृद्धीमध्ये पाठबळ देऊन त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला गती देण्याचे काम केले जाते. हा उपक्रम महाराष्ट्रातील DPIIT नोंदणीकृत स्टार्टअप्ससाठी 6 महिन्यांचा विस्तृत उपक्रम असणार आहे. यामध्ये मागील एक वर्षात 1 कोटी ते 15 कोटी रुपयांदरम्यान उलाढाल असणाऱ्या निवडक 25 स्टार्टअप्सना याचा विशेष फायदा होणार आहे. या उपक्रमाच्या लाभार्थींमध्ये महिला उद्योजक स्टार्टअप व ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना प्राधान्य दिले जाणार आहे.

मंत्री लोढा यावेळी म्हणाले की, ग्रामीण भागासह शेवटच्या घटकापर्यंत स्टार्टअप संस्कृती निर्माण करणे हा राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सना चालना देण्यात येत आहे. राज्यातही स्टार्टअप्सना प्रोत्साहनासाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत असून यापुढील काळात त्यांना अधिक गती देण्यात येईल.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, विविध शासकीय विभागांमध्ये नाविन्यता आणण्यासाठी तसेच स्टार्टअप्सचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही शासनाच्या विविध विभागांसमवेत भागीदारी करत आहोत. येणाऱ्या काळात व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप्ससाठी सीड फंडची योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. रामास्वामी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून राज्यातील नवउद्योजक व स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तसेच येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील  नवउद्योजक व महिला उद्योजकांसाठी नाविन्यता सोसायटीमार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी अर्था – स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपचे सहसंस्थापक टी. एन. हरी यांनी आपल्या अनुभवातून देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेचा सुरवातीपासूनचा प्रवास सांगितला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्था बळकटीसाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक चेतना गाला यांनी ग्रामीण भागात सुरु असलेल्या विविध कामांची माहिती दिली.  महिला उद्योजिकांना यशस्वी होण्यासाठी त्यांचे धैर्य हेच खरे भांडवल आहे असे सांगून त्यांनी महिला उद्योजकांना प्रेरित केले. युअर स्टोरी मीडियाच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी भारतीय स्टार्टअप व नाविन्यता परिसंस्थेच्या मागील १४ वर्षातील प्रवासाविषयी आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील नवउद्योजकांच्या यशोगाथा सर्वत्र पोहोचविण्यासाठी  युअर स्टोरी मीडिया काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. स्टार्टअप एक्स्पर्ट रवी रंजन यांनी स्टार्टअप संस्थापक व इनक्यूबेटर्सला एंजेल फंडींगबाबत विशेष मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहाय्यक व्यवस्थापक अमित कोठावदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×