कल्याण/प्रतिनिधी – राज्य सरकारने गुठखा विक्रीवर बंदी घातली असूनही अनेक ठिकाणी अवैधपणे गुठख्याची विक्री केली जाते. ठाणे जिल्ह्यातून पुन्हा एकदा गुठख्याचा साठा मिळाल्याने खळबळ माजली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील सी ब्लॉक परिसरातील एका घरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर गुठख्याची साठवणूक करण्यात आली होती. तब्बल १२ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. परंतु आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आले नाही.
सी ब्लॉक परिसरातील एका घरात गुटखा माफियाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी सापळा रचून आसिफ शेखच्या घरावर छापा टाकला. पण पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच आरोपी आसिफ शेख याने तेथून पळ काढला. आरोपीच्या घरात विमल पान मसाला, जाफराणी जर्दा, सुगंधित पान मसाला, तंबाखू असा विविध कंपनीचा माल सापडला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितली. आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.