नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – देशभरात महिलांवर होत असलेल्या अमानवी अत्याचाराबाबात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात निषेध नोंदविण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. कल्याणमध्ये देखील मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी तोंडाला काळ्या फिटी लावून तहसीलदारांना निवेदन दिले. या आंदोलनात ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, जिल्हा कातकरी प्रमुख हनुमान तांडेल, तालुका अध्यक्ष विष्णु वाघे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण वाघे, ज्योती फसाले, तालुका सचिव नंदु जाधव, तालुका महीला प्रमुख धाकुबाई शेलके, अरूण पवार, लहु भोकटे, अर्जुन अवारे, अनिता वायडे, पूष्पा वाघे, उषा वाघे आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील, सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील सोनवडी बु. या गावात आदिम कातकरी जमातीतील मजूर महिलेला जेरबंद करून तिच्यावर अमानुष अत्याचार करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेने उघड आणला. येथील तक्रारदार महिलेसह अनेक महिलेला येथील भांडवलदार मालकानं त्याच्या पाच साथीदारांसह बलात्कार करून प्रताडीत केले होते. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या महिलेला वाचवून त्यांना पोलिसांपर्यंत पोहचवले आणि कायदेशीर कारवाई करून संबंधित नराधमाला तुरुंगात टाकले.
मात्र या महीलेसारख्या असंख्य महिला उपजिविकेसाठी आपल्या कुटुंबासह स्थलांतरीत होतात. याच काळात त्यांच्यावर असे अमानवी पाशवी अत्याचार केले जातात. ही एक घटना उघडकीस आली असली तरी अशा अनेक घटना घडतात. सरकार मात्र या बाबत गंभीर नसल्याने असे अत्याचार कमी होण्याऐवजी वाढत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आज आंदोलन करून आम्ही मणिपूर अत्याचार आणि साताऱ्यातील अमानुष कृत्य या घटनांसोबत देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध नोंदवत असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना याच काळात मणिपूरमधील दोन महिलांना नग्न करून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत एक झुंड निघाली असल्याचा व्हिडिओ जेव्हा देशभर प्रसारीत झाला, या घटनेवर सर्वच थरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. महिलांवर अत्याचार करणारे कुणीही निषेधात्मक अशा घटना कुठेही आणि कुणीही करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.