नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बीड/प्रतिनिधी – बीडच्या केज पोलिसांना अत्यंत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी कोट्यवधीचे चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. या टेम्पोमधून एकूण 2 कोटी 18 लाख रुपयांच्या चंदनची चोरटी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या चंदन तस्करीची माहिती मिळताच सापळा रचून 1250 किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. या चंदनाची बाजारात दोन कोटींची किंमत आहे.
या कारवाईत दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे. एक आयशर टेम्पो चंदन घेऊन केजकडून धारूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पहाटे पहाटेच ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना या टेम्पोत 60 गोण्या चंदन आढळून आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी जप्त केलेले चंदन आणि टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी प्रकरणी वन अधिनियम आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.