नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पत्र सूचना कार्यालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने आरोग्य क्षेत्रात वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी नॉलेज शेअरिंग प्रेस टूर आयोजित केली होती. आपल्या वैज्ञानिक समुदायांची कामगिरी, नवीन लस विकसित करण्याची विशेषतः स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सीन लसीची वैज्ञानिक प्रक्रिया त्याचप्रमाणे आव्हाने आणि संधी यांची माहिती पत्रकारांना व्हावी, हा या पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्याचा उद्देश होता.
आयसीएमआर -एनआयव्हीच्या संचालिका डॉ प्रिया अब्राहम यांनी आरोग्य क्षेत्रात वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना संबोधित केले आणि प्रख्यात शास्त्रज्ञांच्या चमूसोबत त्यांनी महामारीच्या प्रारंभापासून या संस्थेने एका प्रयोगशाळेपासून सुरुवात करत इतक्या कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा कशा तयार केल्या आणि स्वदेशी लस विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न प्रसारमाध्यमांसमोर मांडले. “महामारीच्या काळात, जेव्हा जगभरातील आघाडीच्या प्रयोगशाळांमध्ये पीसीआर चाचण्या करताना लागणाऱ्या रासायनिक घटकांची (अभिकर्मकांची) कमतरता होती, तेव्हा आयसीएमआर -राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने (एनआयव्ही) देशाच्या विविध भागांमध्ये 64 लाखांहून अधिक आरटी- पीसीआर अभिकर्मक पाठवले होते. इतकेच नाही तर संस्थेने संच मूल्यांकनासाठी व्यासपीठही उपलब्ध करून दिले आणि जे संच प्रमाणित करण्यासाठी पुढे आले त्या अनेक नवउद्योजकांना आणि मेड-इन-इंडिया कंपन्यांना हाताशी धरून त्यांना संस्थेने पाठबळ दिले. आत्मनिर्भर भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम होता. संस्थेने त्यावेळी सुमारे 500 संचांचे प्रमाणीकरण केले, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने देशातील कोविड-19 महामारीशी लढा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे; लस संशोधन आणि विकास, चाचणी संच, जनुकीय अनुक्रम निर्धारण इत्यादींमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवले, असे त्या म्हणाल्या.
चाचणी स्थापित करणे आणि देशातील पहिले सार्स कोव्ह-2 रुग्ण शोधणे, चिंतेची बाब म्हणून वर्गवारी झालेल्या विषाणूचे पृथक्करण, आरटीपीसीआर चाचणीसाठी अनेक प्रयोगशाळा कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे, राष्ट्रीय सेरो-सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे स्वदेशी तपासणी परीक्षण संच तयार करणे आणि आणि आजारातून बरे झालेल्यांच्या प्लाझ्मा चाचण्या, लसींच्या चाचण्यांसाठी जिवंत आणि निष्क्रिय विषाणू प्रदान करणे,विषाणूच्या विविध प्रकारांविरूद्ध रोगप्रतिकारक प्रतिसादाचा अभ्यास करणे, लसींसाठी मानवी चाचणी पूर्व चाचण्या आणि मानवी चाचण्यांसाठी पाठबळ याप्रकारचे बहुआयामी योगदान महामारीच्या काळात आयसीएमआर -एनआयव्हीने दिले आहे.
आरोग्य क्षेत्रात वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी एनआयव्हीचा मुख्य परिसर आणि एनआयव्हीचा पाषाण परिसर संस्थेच्या या दोन संकुलात काही अत्याधुनिक प्रयोगशाळांना भेट दिली. यामध्ये नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटर, बायोइन्फर्मेटिक्स सेंटर, अॅनिमल हाऊस, व्हायरोलॉजी डायग्नोस्टिक्स, बीएसएल -3 प्रयोगशाळा, मायक्रोबियल कंटेनमेंट कॉम्प्लेक्स (एमसीसी) (अत्यंत संसर्गजन्य प्रकाराचे सूक्ष्मजीव हाताळण्यासाठी पी -3 जैवसुरक्षा पातळी असणे), वैद्यकीय कीटकशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभाग यांचा समावेश आहे.शास्त्रज्ञांनी विषाणूशास्त्राच्या विविध क्षेत्रांतील संशोधनांबद्दल आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेची ही वैज्ञानिक संस्था सार्वजनिक आरोग्याच्या महत्वाच्या दृष्टीने विषाणूंवर संशोधन कसे करते हे स्पष्ट केले.
राष्ट्रीय एड्स संशोधन सोबत (एनएआरआय) अतिशय समृद्ध करणाऱ्या आणि ज्ञान सामायिक करणाऱ्या कार्यशाळेतही पत्रकारांनी सहभाग घेतला.
आयसीएमआर -एनएआरआयमध्ये एड्स संशोधनासाठी प्रतिबद्ध समुदाय किती महत्त्वाचा आहे हे नमूद करण्यात आले. एनएआरआयने भारतातील पहिल्या एचआयव्ही लसीची चाचणी घेतली होती.