नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
पुणे/प्रतिनिधी – “येळकोट येळकोट जय मल्हार” चा जयघोष करत मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी आज जेजूरी गडावर पाहायला मिळतेय. निमित्त आहे ते म्हणजे सोमवती अमवस्येचं. महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केलेली आहे. “येळकोट येळकोट जय मल्हार”, असा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी गेली. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय.
आपल्या आराध्य दैवताची एक झलक पाहण्यासाठी भाविकांच्या मोठ-मोठाल्या रांगा लागलेल्या आहेत. खंडेरायाची जेजुरी आज सोन्यासारखी पिवळीधमक झाली आहे. सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे.