नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून त्याला तोंड देण्यासाठी केडीएमसी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचा आरोप भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी केला आहे. वरुण पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह केडीएमसीच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी केली.
कल्याण डोंबिवलीकर डेंग्यू, मलेरिया यासह साथीच्या विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत. रुक्मिणीबाई रुग्णालयात डेंग्यू आणि मलेरिया झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. मात्र या आजारांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा आणि डॉक्ट्रांचीही कमतरता जाणवत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
कल्याण पश्चिमेची वाढलेली लोकसंख्या पाहता रुख्मिणीबाई रुग्णालय अपुरे पडत आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला विचारात घेता याठिकाणी एका सुसज्ज अशा मोठ्या रुग्णालयाची गरज वरुण पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान राज्यामध्ये आमचेच सरकार असून कल्याण पश्चिमेत सुसज्ज रुग्णालय होण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान या दौऱ्यात त्यांनी ओपीडी रूम, जनरल वॉर्ड, लहान मुलांचे वॉर्ड, औषद भांडार यासह नव्याने तयार होणाऱ्या प्रयोगशाळा आदींची पाहणी केली. तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांशी संवाद साधत त्यांच्याकडून उपचार तसेच इतर विषयांची माहिती घेतली.
यावेळी वरुण पाटील यांच्यासह भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मंगला वाघ, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक स्वप्निल काठे, जिल्हा सचिव रितेश फडके, महिला मोर्चा जिल्हा सचिव निर्मला कदम, कल्याण पश्चिम महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते